
हृदयविकाराचा झटका आलेल्या कर्मचाऱ्याला स्वतः हेलिकॉप्टर उडवून हेडरीहून नागपूरला नेले
गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतःचे हेलिकॉप्टर उडवून हृदयविकाराचा झटका आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचवला. गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी येथे तैनात असलेले पोलीस नाईक राहुल साहेबराव गायकवाड (३७) यांना तात्काळ नागपूर येथील विशेष रुग्णालयात हलवल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. बी. प्रभाकरन यांच्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२ ऑगस्ट रोजी बी. प्रभाकरन हे सुरजागड लोहखनिज खाणींच्या तपासणीसाठी हेडरी येथे होते. दुपारी १२ वाजता पोलीस नाईक राहुल गायकवाड यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेता, त्यांना तातडीने विशेष हृदयोपचार रुग्णालयात हलवणे आवश्यक होते. वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस विभागाने एलएमईएलच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून हेलिकॉप्टरची मदत मागितली. बी. प्रभाकरन यांनी तातडीने हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले आणि स्वतः पायलटची भूमिका स्वीकारून दुपारी २:४५ वाजता हेडरीहून नागपूरकडे उड्डाण केले.
बी. प्रभाकरन यांना विमान उड्डाणाचा एक दशकाहून अधिक अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या सर्व पूर्वनियोजित बैठका रद्द करून गायकवाड यांना नागपूरला नेले. हेलिकॉप्टरमध्ये रुग्णाच्या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णालयाचे नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते. दुपारी ३:४० वाजता हेलिकॉप्टर नागपूर विमानतळावर पोहोचले, जिथे ऑरेंज सिटी हॉस्पिटलची रुग्णवाहिका प्रतीक्षेत होती.
गायकवाड यांच्या तपासणीत एक धमनी ब्लॉक असल्याचे आढळले. ४ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर यशस्वीरित्या स्टेंट बसवण्यात आला आणि ५ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. लॉईड्स हॉस्पिटलमधील दर्जेदार आरोग्यसेवा, एलएमईएलने वेळेवर दिलेली मदत आणि बी. प्रभाकरन यांच्या तत्परतेमुळे पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला आहे.



