क्राईमगडचिरोलीविदर्भ

अधिपरिचारिकेचा शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मेडिकल कॉलनीतील धक्कादायक प्रकार; स्वतःच्या नावावरचा प्लॉट सासूच्या नावे करण्यासाठी मारहाण आणि धमकी

गडचिरोली : शिक्षित आणि शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलाही आजही कौटुंबिक अत्याचाराच्या कचाट्यातून सुटलेल्या नाहीत, याचे एक विदारक उदाहरण गडचिरोलीत समोर आले आहे. येथील एका ३३ वर्षीय अधिपरिचारिकेचा (नर्स) हुंडा आणि पगाराच्या पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

निशा पंकज मेश्राम (रा. मेडिकल कॉलनी, गडचिरोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ मार्च २०२१ रोजी त्यांचा विवाह पंकज ठाकूरदास मेश्राम यांच्याशी झाला होता. संसाराची स्वप्ने रंगवून सासरी गेलेल्या निशा यांना लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच सासरच्या मंडळींच्या छळाला सामोरे जावे लागले. सासू आणि नणंदेने पतीचे कान भरून वाद निर्माण करण्यास सुरुवात केली, असा आरोप निशा यांनी केला आहे.

निशा या शासकीय सेवेत कार्यरत असल्याने त्यांचा संपूर्ण पगार सासरच्यांनी स्वतःकडे मागण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर निशा यांनी स्वकष्टाने खरेदी केलेला प्लॉट सासूच्या नावावर करण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला गेला. या कारणावरून त्यांना वारंवार मारहाण करण्यात आली आणि पगार न दिल्यास घरातून हाकलून देण्याची धमकीही देण्यात आली.

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत अत्यंत हृदयद्रावक माहिती दिली आहे. त्या गर्भवती असतानाही त्यांना ड्युटीवर जाण्यासाठी कोणतेही सहकार्य न करता उलट त्रास देण्यात आला. त्यांना वेळोवेळी हिणवून मानसिक खच्चीकरण करण्यात आले. आईच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांना आधाराची गरज होती, तेव्हा सासरच्यांनी पतीला त्यांच्यापासून दूर राहण्यास भडकवले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

निशा मेश्राम यांच्या तक्रारीची दखल घेत गडचिरोली पोलिसांनी खालील पाच जणांविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ११५(२), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे: १. पंकज ठाकूरदास मेश्राम (पती) २. संगीता ठाकूरदास मेश्राम (सासू) ३. ठाकूरदास बुधाजी मेश्राम (सासरे) ४. मनीषा कोमल ओडरे (मोठी नणंद) ५. रोहिदास बुधाजी मेश्राम (मोठे सासरे)

या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार मनीषा बागमारे करीत आहेत. एका सुशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे शासकीय वसाहत आणि मेडिकल कॉलनी परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button