
साकोली : शहरालगतच्या लाखांदूर रोड परिसरातील शेतात मंगळवारी (१९ मे) सकाळी घडलेल्या एका दुर्देवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आपल्या शेताला लागलेली आग विझवण्यासाठी धावलेल्या एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रामदास गोखलू निंबेकर (रा. तलाव वॉर्ड, साकोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
रामदास निंबेकर यांचे लाखांदूर रोडवर शेत असून त्यांनी तेथे मक्याचे पीक घेतले होते. पीक परिपक्व झाले असताना, मंगळवारी सकाळी १०:२५ वाजण्याच्या सुमारास अचानक शेताला आग लागली. कष्टाने पिकवलेले उभे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे पाहून रामदास निंबेकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र, वाऱ्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आणि दुर्दैवाने रामदास निंबेकर आगीच्या वेढ्यात अडकले.
आगीचा भडका पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांना वाचवण्याचा निकराचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की नागरिकांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी साकोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत रामदास निंबेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तलाठ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन शेतातील नुकसानीची पाहणी केली आणि अहवाल तयार केला आहे.
शेताला आग नक्की कशामुळे लागली (वणव्यामुळे की अन्य कारणाने), हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्देवी घटनेमुळे साकोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



