
कुरखेडा : तालुक्यातील मौशी येथील रहिवासी असलेले अनिल बाबूराव मदावी (वय ३२) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी गावालगतच्या जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मदावी हे रविवार दुपारपासून घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवली होती. अखेर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास डोंगराजवळील बंधाऱ्याशेजारी असलेल्या जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला.
कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे पाठवला आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनिल मदावी यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



