गडचिरोलीविदर्भ

‘कौन बनेगा हिंदी सम्राट’ : गडचिरोलीत हिंदी दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, वीर सावरकर हाउसचा संघ विजेता

गडचिरोली : देशात हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या हिंदी दिनानिमित्त गोंडवाना सैनिकी विद्यालयात ‘कौन बनेगा हिंदी सम्राट?’ या हिंदी प्रश्नांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मनोरंजक स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दलची आवड वाढण्यास मदत झाली.

प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी करण्यात आले होते. यामध्ये शब्दो का जाल, भाषा कि जादुगरी, शब्दो का गुलदस्ता, रिश्तो का चक्रव्यूह, बुझो तो जाने, पहचान कोण? अशा एकूण सहा फेऱ्या होत्या. यात म्हणी, वाक्प्रचार, विरुद्धार्थी शब्द अशा विविध घटकांवर प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर माध्यमातूनही ज्ञान मिळवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत वीर सावरकर हाउसच्या संघाने १५० पैकी १२० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. या संघात योग नैताम, परिमल वडस्कर, नमन तुलावी आणि युगांत येलमुले यांचा समावेश होता. दुसऱ्या क्रमांकावर १०५ गुणांसह सुभाषचंद्र बोस हाउसचा संघ राहिला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा. संदीप कोटांगले, प्रा. गजानन ढोले, हिंदी शिक्षक किशोरलाल साठवणे, शाहदुल्ला खान, सैनिकी निदेशक हरिप्रसाद ग्यानी उपस्थित होते. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन वरिष्ठ शिक्षक संतोष बोबाटे यांनी केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button