
तीन वर्षांपासून काम अपूर्णच, आंदोलनानंतर प्रशासनाकडून काम सुरू करण्याचे आश्वासन
घुग्घुस : घुग्घुस रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना दररोज तासनतास बसमध्येच अडकून राहावे लागते. या समस्येला कंटाळून संतप्त महिलांनी शनिवारी (दि. १६) दुपारी १ वाजता वाहतूक रोखून प्रशासनाचा निषेध केला. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घुग्घुस रेल्वे गेट क्रमांक ३९ येथून मोठ्या प्रमाणात कोळसा आणि सिमेंटची वाहतूक होते. यामुळे दिवसातून १८ ते २० वेळा हे गेट बंद केले जाते. त्यामुळे वाहनधारक, वेकोलि कामगार आणि स्थानिक नागरिकांना ताटकळत राहावे लागते. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास या समस्येवर तोडगा निघेल, अशी आशा होती, पण कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांचा संयम सुटला.
या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. २८ ऑगस्टपासून उड्डाणपुलाचे काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर तीन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.



