
कंत्राटदाराच्या परवाना नूतनीकरणासाठी मागितली होती लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
नागपूर : नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक कार्यालय नागपूरचे मुख्य अभियंता (वर्ग-१ अधिकारी) सुभाष बबन भुजबळ यांना ३०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. कंत्राटदाराच्या शासकीय परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी भुजबळ यांनी ही लाच मागितली होती. या धडक कारवाईमुळे शासकीय वर्तुळात आणि विशेषतः प्राधिकरणाच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे एक नोंदणीकृत कंत्राटदार असून ते महाराष्ट्र शासनाची कंत्राटी कामे करतात. त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत शासकीय कामे करण्याच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी नागपूर प्रादेशिक कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. तसेच अर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांचा संच त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन जमा केला होता. मात्र, या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी कंत्राटदाराकडे ३०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. कंत्राटदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी थेट नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या सापळा अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यामध्ये आरोपी लोकसेवक सुभाष भुजबळ यांनी ३०,००० रुपयांची लाच मागून ती स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १० जून २०२६ रोजी नागपूर एसीबीच्या पथकाने कार्यालयात सापळा रचला. मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयातील त्यांच्या स्वतःच्याच दालनात (केबिन) तक्रारदाराकडून ३०,००० रुपयांची लाच स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ बेड्या ठोकल्या. आरोपी सुभाष भुजबळ यांच्याविरुद्ध नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक भारती गुरनुले यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा व अटकेच्या या मोहिमेत पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, महिला पोलीस हवालदार अस्मिता मेश्राम, करुणा सहारे, गीता चौधरी, पोलीस हवालदार आशिष वैद्य, पोलीस शिपाई प्रफुल भातुलकर, होमेश्वर वाईलकर, स्वाती हिडोरिया आणि वाहन चालक राजेंद्र जांभुळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



