गडचिरोलीविदर्भ

चित्ररथाद्वारे योजनांची व्यापक जनजागृती ; नागरिकांनी लाभ घ्यावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी चित्ररथाद्वारे जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून नागरिकांनी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेत त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या चित्ररथाला १ मे रोजी जिल्हा माहिती कार्यालय येथून सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्याचा उद्देश आहे. यावेळी शासनाच्या विविध योजनांवर आधारित माहितीपर घडीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम., ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चित्ररथाच्या माध्यमातून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, महाराजस्व अभियान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, रमाई घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी निवासी शाळा, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, स्वाधार योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना यांचा समावेश असून या योजनांची माहिती बॅनर, ऑडिओ जिंगल्स व घडीपत्रिकेद्वारे दिली जात आहे.

जिल्ह्यातील दुर्गम भागांसह सर्व स्तरांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवून लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन शासनाच्या योजनांचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button