
अहेरी : तालुक्यातील कमलापूर येथील गुरुदेव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डी.एन. सहारे यांची प्रकृती बिघडल्याने ते वैद्यकीय रजेवर असल्याने कर्तव्यावर होऊन शकले नाही. मात्र त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुनही संस्थेने त्यांना रुजू करण्यास नकार दिला आहे. यामुळे अन्यायग्रस्त सहारे यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने त्यांनी आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याची अगतिकता व्यक्त केली आहे. सदर समस्येला घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी रेपनपल्ली उपपोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविली आहे.
सविस्तर वृत्त असे की, डी.एन. सहारे हे कमलापूर येथील गुरुदेव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने ते 21 फेब्रुवारी 2022 पासून कर्तव्यावर हजर होऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी सर्व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करीत रुजु करण्याची विनंती संस्थेकडे केली. मात्र संस्थेने त्यांना रुजू करुन घेण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच संबंधित कालावधीतील वेतनही बंद असल्याने त्यांना आर्थिक, मानसिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. संपूर्ण कुटूंबियांवर उपासमारीची पाळी आली असल्याने आत्मदहनाशिवाय पर्याय राहिले नसल्याची अगतिकता त्यांनी सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांचेसमोर मांडली. यासंदर्भात ताटीकोंडावार यांनी थेट रेपनपल्ली उपपोलिस ठाणे गाठित या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करुन अन्यायग्रस्त सहारे यांना रुजू करुन घेत शिक्षकाला मानसीक त्रास देणा-या संस्थेवर कारवाई करावी, अशी तक्रार दाखल केली आहे.



