क्राईमगोंदियायवतमाळविदर्भ

५७ लाखांचा रेशनचा तांदूळ जप्त, काळ्या बाजारात विक्रीचा डाव उधळला

आर्णी-यवतमाळ मार्गावर पोलिसांनी रचला सापळा, दोघांना अटक

यवतमाळ : शासनाकडून गरीब व गरजू लोकांसाठी पाठविण्यात येणारा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने आर्णी-यवतमाळ मार्गावरील मनदेव घाटात सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५७ लाख ६४ हजार २०० रुपये किमतीचा तांदूळ आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मोहसीन शेख कादर (वय ३४, रा. देऊरवाडी पुनर्वसन, दिग्रस) आणि हाफीज बेग सनाउल्ला बेग (वय ३४, रा. बाराभाई मोहल्ला, दिग्रस) अशी आरोपींची नावे आहेत. एलसीबीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, यवतमाळमधील रेशन दुकानांसाठी आलेला तांदूळ गोंदिया येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मनदेव घाटात सापळा रचला.

दरम्यान, एमएच २९ बीई ८५३२ क्रमांकाचा एक ट्रक त्या ठिकाणी येताना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून त्यातील दोघांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच, ट्रकमधील तांदळाबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा बिले सादर केली नाहीत. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. यानंतर एलसीबीच्या पथकाने दोघांनाही ट्रकसह ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी यवतमाळ तहसीलदारांकडून तांदळाच्या रेशन संबंधित अहवाल मागविण्यात आला. सदर तांदूळ रेशनचा असल्याची खात्री झाल्यानंतर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, नीलेश राठोड, रितुराज मेडवे आणि आकाश सहारे यांच्या पथकाने केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button