भंडाराविदर्भ

जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय ‘इन्स्पायर अवॉर्ड’ विज्ञान प्रदर्शनीचा भव्य शुभारंभ

शहापूर येथे ४७५ मॉडेल्ससह ३७ जिल्ह्यांचे बाल वैज्ञानिक सहभागी; संशोधन वृत्ती वाढवण्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे आवाहन

भंडारा : ग्रामीण भागातील संशोधन वृत्तीला नवी दिशा देण्यासाठी, भंडारा जिल्ह्याच्या शहापूर नगरीत (दि. २७) राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनी २०२५ चा भव्य शुभारंभ झाला. राज्य विज्ञान शिक्षण उच्च संस्था, नागपूर आणि SGB डिफेन्स सर्विसेस ज्यु. कॉलेज शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाने, राज्यातील बाल वैज्ञानिकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

मागील दोन वर्षांची संयुक्त प्रदर्शनी असल्याने, या राज्यस्तरीय सोहळ्यात महाराष्ट्रातील ३७ जिल्ह्यांमधून आलेल्या एकूण ४७५ विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. हा सोहळा केवळ भंडारा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आयोजित होणारे पहिलेच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन ठरले आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. SGB डिफेन्स सर्व्हिसेस ज्यु. कॉलेजचे संस्थापक प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर यांनी पुढाकार घेऊन आयोजनाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली.

प्रदर्शनाचे उद्घाटन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या शुभहस्ते झाले. विज्ञान प्राधिकरण संचालक डॉ. रामकुमार अवसरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी अहमदाबादचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील भास्कर सर व डॉ. संध्या तिवारी मॅडम, प्राचार्य राजेश रूद्रकार, प्रा. नरेंद्र पालांदुरकर, शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्यासह अनेक वरिष्ठ शिक्षण अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेचे कौतुक केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात समस्या सोडवण्यासाठी कसा महत्त्वाचा आहे, यावर विशेष भर दिला.

प्रदर्शनात सादर झालेले प्रकल्प पर्यावरण संरक्षण, अक्षय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य तंत्रज्ञान आणि शेती सुधारणा यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर आधारित आहेत. इलेक्ट्रॉनिक मॉडेल्स, रोबोटिक्स, ड्रोन आधारित तंत्रज्ञान आणि ग्रामीण जीवनमान उंचावणाऱ्या अनेक संशोधन कल्पनांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटनानंतर मान्यवरांनी स्टॉल्सना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. प्रदर्शनासाठी आलेल्या सर्व बाल वैज्ञानिक व मार्गदर्शक शिक्षकांची निवास आणि भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था SGB डिफेन्स सर्व्हिसेस ज्यु. कॉलेज, शहापूरच्या आयोजकांनी केली, ज्याचे सर्व सहभागींनी कौतुक केले.

प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर यांनी सांगितले की, केवळ विज्ञानच नव्हे, तर या निमित्ताने सर्व सहभागींना भंडारा जिल्ह्याचे वन वैभव व सांस्कृतिक वैभव दाखवणे हा देखील आयोजनामागील एक उद्देश आहे. यासोबतच पुढील दोन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

भंडारा जिल्ह्याला अभिमानास्पद व्यासपीठ मिळवून देणारी ही विज्ञान प्रदर्शनी पुढील दोन दिवस (दि. २८ व २९) सर्वांसाठी खुली राहणार आहे. जिल्ह्यातील विज्ञानप्रेमी नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीतू गावंडे यांनी, तर आभार प्रदर्शन नरेंद्र पालांदुरकर यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद ठवकर व मनिषा लोंदासे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button