
गडचिरोली : कमी होत चाललेले जमिनीचे क्षेत्र आणि बदलते हवामान लक्षात घेता, शेतकऱ्यांनी केवळ धान पिकावर अवलंबून न राहता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकात्मिक पिक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (पी.डी.के.व्ही.) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
आदर्श गाव हिरापूर येथे झालेल्या आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी पी.डी.के.व्ही.चे संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने, कृषी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरीपुंजे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ तसेच हिरापूर गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
डॉ. गडाख यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या भातशेतीच्या बांधावर आंबा, सीताफळ, पेरू यांसारखी फळझाडे लावण्याचा सल्ला दिला. तसेच, शेवगा आणि हादगा यांसारख्या पौष्टिक, बहुवार्षिक आणि कमी वेळेत उत्पादन देणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करण्यास सांगितले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून, विद्यापीठ यासाठी सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पी.डी.के.व्ही.चे संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने यांनी तिलक, साधना, आणि साक्षी या जास्त उत्पादन देणाऱ्या भाताच्या नवीन वाणांचा वापर करण्याचे आवाहन केले. कृषी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांनी आंब्याच्या केसर, लंगडा, दशहरी, मल्लिका आणि अम्रापाली या जातींची सघन पद्धतीने (High-Density Planting) लागवड करून अधिक उत्पन्न मिळवण्याचा सल्ला दिला. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, पशुसंवर्धन, मत्स्य विभाग आणि इतर सरकारी संस्थांकडून मिळणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनाचा फायदा घेण्याचे सांगितले. त्यांनी पारंपरिक शेती पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला. त्यानंतर डॉ. शरद गडाख यांनी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथील विविध पिक प्रात्यक्षिकाला भेट दिली. कृषी विज्ञान केंद्राने वर्षभरात केलेल्या कार्याचे सादरीकरण कुलगुरू यांच्या समक्ष करण्यात आले.
मत्स्य प्रकल्प आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन
कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहाय्यक आयुक्त समिर डोंगरे यांच्या हस्ते मत्स्य प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यात रोहू, कतला आणि मृगल या जातींचे ६,००० मत्स्यबीज एका बोडीत सोडण्यात आले. यासोबतच जैविक कीडनाशके व रोगनाशके निर्मिती, जैविक द्रवरूप जीवाणू संवर्धक निर्मिती आणि अद्ययावत माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरणामध्ये मदत होणार आहे.



