
गडचिरोली : जिल्ह्यात ९ ते ११ जुलै या कालावधीत आलेल्या तीन दिवसांच्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले, याचा मोठा फटका एसटी महामंडळालाही बसला आहे. बहुतांश प्रमुख मार्ग बंद असल्याने एसटीला प्रवासी वाहतूक करता आली नाही, परिणामी तीन दिवसांचे सुमारे १२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत पाणी सोडल्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गडचिरोली तालुक्यातील पाल नदी पुलावर पाणी आल्याने आरमोरी आणि त्यापुढील सर्व एसटी फेऱ्या बंद होत्या. चामोर्शी मार्गावरील शिवणी नाल्यावर पाणी असल्याने चामोर्शीपुढील मार्ग बंद झाले होते.
काही नागरिकांना नागपूरला जाणे अतिशय आवश्यक असल्याने, मोजक्याच फेऱ्या सिंदेवाही मार्गे नागपूरसाठी सोडण्यात आल्या होत्या. दरवर्षी पुरामुळे रस्ते बंद होतात आणि दळणवळण ठप्प होते, ज्याचा फटका एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो.
गडचिरोली आगारातील बसेस दररोज जवळपास १३ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. मात्र, या तीन दिवसांच्या पूरस्थितीमुळे एसटीच्या फेऱ्या थांबल्याने सुमारे ४० हजार किलोमीटरचा प्रवास थांबला. यामुळे एसटी महामंडळाला १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.
मानव विकास मिशनच्या माध्यमातून विद्यार्थिनींची वाहतूक करणाऱ्या बसेसही पुरामुळे जागेवरच थांबलेल्या होत्या. या तीन दिवसांत गडचिरोली बसस्थानकात जणू संचारबंदीच लागल्यासारखी स्थिती होती. कर्तव्यावर आलेले चालक आणि वाहक केवळ हजेरी लावून परत जात होते.



