
गडचिरोली : तालुक्यातील मुडझा येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ६ कोटी ४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या विकासकामांमध्ये रस्त्यांचे बांधकाम, नाल्या, मोऱ्या आणि सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होणार आहे.
डॉ. होळी यांच्या प्रयत्नातून २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षात ही विकासकामे मंजूर झाली आहेत. भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने सिमेंट काँक्रिट (CC) रस्ते, नाली आणि मोरी बांधकामांचा समावेश आहे. यासाठी ३०५४ (TSP) अंतर्गत १.७७ कोटी, जनरल बजेटमधून १.७५ कोटी, आणि दलित वस्ती निधीतून ३२ लाख रुपये असे एकूण ३.८४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, लोकार्पण करण्यात आलेल्या कामांमध्येही रस्ते, नाली, सभामंडप आणि आवारभिंत यांसारख्या बांधकामांचा समावेश आहे. यासाठी खनिज निधीतून १.७० कोटी, तांडा वस्ती निधीतून १० लाख, २५१५ निधीतून २० लाख, आमदार निधीतून १० लाख आणि जिल्हा वार्षिक योजनेतून १० लाख रुपये असे एकूण २.२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
याप्रसंगी डॉ. होळी यांनी संबंधित विभागप्रमुख आणि कंत्राटदारांना सुरू असलेले बांधकाम उच्च दर्जाचे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाला मुडझा ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत कोवे, सदस्य रामदास सुरपाम, राकेश लोणारकार, जोत्सना उमरगुंडावार, हेमंत बोरकुटे, शंकर चुधरी, चंदू लोणारकर, मनोहर वाढई, मनोज गडपायले, मधुकर लोणारकर, विकेश गडपायले, आकाश चौधरी, खूबसूरत दाणे, पुरुषोत्तम मेश्राम, सारिका मोगरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.



