मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली वेलादी कुटुंबाची भेट
यापुढे अंधश्रध्देला बळी न पडण्याचे केले आवाहन ; आर्थिक मदतही केली

अहेरी : तालुक्यातील येर्रागड्डा येथील बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे) हे दोन्ही भावंडे एकापाठोपाठ 4 सप्टेंबर रोजी मरण पावल्याने वेलादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याची माहिती मिळताच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व वीस हजाराची आर्थिक मदत करून या पुढेही सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
अहेरी तालुक्यातील पत्तीगाव हे मृतक बालकाचे आजोबाचे गाव असून निधनाच्या दोन दिवसाआधी आई-वडीलांसमवेत ते पत्तीगाव येथे आले होते. बुधवारी बाजीरावला ताप आला. पाठोपाठ लहान भाऊ दिनेशही आजारी पडला. आई-वडिलांनी दवाखान्यात नेण्याऐवजी त्यांना परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. काही वेळातच म्हणजे सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान बाजीरावाचा मृत्यू झाला तर दुपारी बारा वाजता दिनेशही प्राण सोडले. शवविच्छेदनाकरिता अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पार्थिव दाखल करण्यात आले असता मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालय गाठून पीडित परिवाराची भेट घेऊन सांत्वन करून वीस हजाराची आर्थिक मदत केली.
याप्रसंगी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी, दुर्घटनेवर नाराजी व दुखवटा व्यक्त करून तबीयत खराब झाल्यास अंधश्रध्देला बळी न पडता आणि पुजारी व जडीबुट्टी न घेता नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा दवाखान्यात औषधोपचार करून घ्यावे असे आवाहनही केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबलु हकीम, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोणे, श्रीकांत मद्दीवार, संतोष तोरे, कैलास कोरेत, सांबय्या करपेत, संदीप ढोलगे आदी उपस्थित होते.



