रेतीसह १५ ट्रॅक्टर जप्त, तस्करांमध्ये खळबळ

गोदावरी नदी पात्रात महसूल विभागाची मोठी कारवाई
सिरोंचा : तालुक्यातील मद्दीकुंटा येथील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची तस्करी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. १० मे रोजी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान केलेल्या या धडक कारवाईत तब्बल १५ ट्रॅक्टर रेतीसह जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नायब तहसीलदार श्रीनिवास तोटावार यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. मद्दीकुंटा परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले होते. यानंतर महसूल विभागाने सापळा रचून अचानक छापा टाकला.
या छाप्यादरम्यान गोदावरी नदीच्या पात्रात १५ ट्रॅक्टर अवैधपणे रेती भरून वाहतूक करताना आढळून आले. महसूल विभागाने तात्काळ सर्व ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय, सिरोंचा येथे जमा केले आहेत. या यशस्वी कारवाईत प्रशांत धात्रक, मंडळ अधिकारी प्रविण डोंगरे, मुरली इचकापे आणि तलाठी संजय सिडाम यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक प्रशासनाने नदीपात्रात उतरून ही कारवाई यशस्वी केली.
सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केल्या होत्या. मात्र, यावर ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने तातडीने धाडसी पाऊल उचलून मोठ्या प्रमाणात रेती माफियांवर कारवाई केल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जप्त केलेल्या सर्व १५ ट्रॅक्टर मालकांविरोधात महसूल विभाग कायदेशीर कारवाई करणार असून, त्यांच्यावर दंडात्मक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, यापुढे अशा अवैध रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे पाहणी आणि कारवाया करण्यात येणार असल्याचे तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे.



