भंडाराविदर्भ

‘जनसुरक्षा कायदा’ रद्द करण्याची मागणी : १० सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

इंडिया आघाडीतील पक्ष तसेच इतर पुरोगामी, धर्मनिरपेक्ष पक्ष व संघटनांनी सहभागी व्हावे – कॉ. हिवराज उके

भंडारा : महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेला ‘जनसुरक्षा कायदा’ हा संविधानविरोधी आणि जनविरोधी असल्याचा आरोप करत तो रद्द करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. या मागणीसाठी १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भंडारा तालुका कौन्सिलची बैठक ३१ ऑगस्ट रोजी कॉम्रेड दिलीप ढगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत, हा कायदा ‘अर्बन नक्षलवादा’च्या नावाखाली विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबतच ‘इंडिया आघाडी’तील आणि इतर सर्व पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, संविधानप्रेमी पक्ष आणि संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनाचे संयोजक आणि भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले आहे.

हा निर्णय १४ ऑगस्ट रोजी मुंबईत डाव्या आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या संमेलनात घेण्यात आला होता. त्यानुसार, १० सप्टेंबर रोजी राज्यभर जिल्हा आणि तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर जनआंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॉम्रेड उके यांनी केले आहे.

या बैठकीत कॉम्रेड ताराचंद देशमुख, वामनराव चांदेवार, गणेश क्षीरसागर, भगवान मेश्राम, गौतम भोयर, माणिकराव कुकडकर, आणि सुखराम धनिस्कर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button