गडचिरोलीविदर्भ

रानटी हत्तीच्या हल्ल्यात गुराखी ठार

पोर्ला वनपरिक्षेत्रातील घटना ; वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा

गडचिरोली: धान पीक बहरत असतानाच पुन्हा एकदा हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव केला आहे. बुधवारी संध्याकाळी पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चुरचुरा येथे एका नर हत्तीने केलेल्या हल्ल्यात वामन मारोती गेडाम (वय ६८) या गुराख्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार, वामन गेडाम हे आपला भाऊ महादेव गेडाम आणि हिरोबी खोब्रागडे यांच्यासह गुरे घेऊन चुरचुरा उपक्षेत्रातील जंगलात गेले होते. त्या भागात हत्तींचा कळप आल्याची माहिती वनविभागाने गावकऱ्यांना दिली होती. हत्तींचा कळप दिसताच महादेव आणि हिरोबी यांनी स्वतःला वाचवण्यासाठी लांबचा रस्ता निवडला. वामन गेडाम हे कळपाच्या शेवटी उभे असलेल्या एका नर हत्तीला पाहू शकले नाहीत आणि त्याच्या हल्ल्यात सापडले. गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना गेडाम यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

या घटनेनंतर वडसा वनविभागाचे सहायक वनसंरक्षक रविंद्र सूर्यवंशी, पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. गेडाम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. वनविभागाने तात्काळ मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली आहे.

पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांनी सांगितले की, या घटनेनंतर वनविभागाने आजूबाजूच्या गावांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांना पुढील काही दिवस जंगलात प्रवेश करू नये असे आवाहन करण्यात आले असून, वनकर्मचारी आणि आरआरटी टीम परिसरात हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button