
वांगेपल्ली येथे ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न! ; आत्राम यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव
अहेरी : अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या प्रदर्शनात जिल्ह्यातील चिमुकल्या शास्त्रज्ञांनी आपल्या कल्पक संशोधनातून विज्ञानाची नवी क्षितिजे खुली केली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, “आज जगातील सर्व प्रगती आणि आधुनिक तंत्रज्ञान केवळ विज्ञानामुळेच शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल निर्माण करण्यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे संशोधन करता यावे, यासाठी येथे आधुनिक ‘विज्ञान प्रयोगशाळा’ उभारण्याची गरज आहे. ही प्रयोगशाळा मंजूर करून घेण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करेन.”

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊतून टिकाऊ वस्तू, कृषी तंत्रज्ञान, प्रदूषण नियंत्रण आणि सौर ऊर्जेवर आधारित अनेक नाविन्यपूर्ण मॉडेल्स सादर केले होते. प्राथमिक आणि माध्यमिक अशा विविध गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक आत्राम होते. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बच्चाव, वैभव बारेकर, उपशिक्षणाधिकारी गेडाम, परसा गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार, नाकाडे, जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, मार्गदर्शक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिस्तबद्ध पद्धतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक शाळा आणि शिक्षण विभागाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे.



