
देसाईगंज : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ हा उदात्त संदेश जनमानसात रुजवणारे संत निरंकारी मंडळ, देसाईगंज शाखेच्या वतीने २४ एप्रिल रोजी संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज (वडसा) येथे सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू बाबा गुरुबचनसिंगजी महाराज आणि अन्य हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘मानव सेवा’ या भावनेतून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सद्गुरू माता सुदिक्षा जी महाराज यांच्या प्रेरणेने गडचिरोली जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने जिल्हा रक्तपेढी व जिल्हा रुग्णालय गडचिरोली यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न होणार आहे. रक्तदान क्षेत्रात संत निरंकारी मंडळ संपूर्ण देशात व जिल्ह्यात सदैव अग्रेसर राहिले आहे.
मागील पाच वर्षांतील आकडेवारी पाहता, कोविड महामारीच्या अत्यंत कठीण काळातही मंडळाने प्रशासनाच्या हाकेला ओ देऊन विक्रमी रक्तदान केले होते. मागील काही वर्षांत अनुक्रमे १६०, १३०, १७०, २५४, १८८ आणि २४९ युनिट रक्ताचा पुरवठा शासकीय रुग्णालयाला करण्यात आला आहे. यावर्षी देखील परिसरातील भाविक आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह असून, साधारण *२५० ते ३०० महिला-पुरुष रक्तदान करतील, असा विश्वास झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांनी व्यक्त केला आहे.
रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी संपूर्ण देसाईगंज शहरात जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये संत निरंकारी सेवादलाचे सुमारे १०० महिला व पुरुष सदस्य आपल्या शिस्तबद्ध गणवेशात सहभागी होऊन जनप्रबोधन करतील.
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी साखळी अधिक मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे. असे आवाहन किशन नागदेवे (झोनल इंचार्ज, संत निरंकारी मंडळ) यांनी केले आहे. मंडळाच्या वतीने सर्व स्तरातील नागरिकांना आणि युवा वर्गाला या महायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



