
हवामान बदल, जलसंधारण, संवर्धित शेती आणि बहुविध कृषी व्यवसायावर सविस्तर मार्गदर्शन
गडचिरोली : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (टप्पा–2) अंतर्गत प्रकल्पाच्या जलद आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली येथे 10 डिसेंबर रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण कार्यशाळा संपन्न झाली. प्रशासकीय पाठबळ, हवामान–अनुकूल शेती तंत्रज्ञान आणि योजनांचा व्यापक प्रसार यावर या कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषविले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत, ‘प्रकल्प राबवताना प्रशासनाचे धोरणात्मक पाठबळ कायम राहील,’ अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, आणि प्रकल्पाशी संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रीती हिरळकर यांनी गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, पर्जन्यमान, मातीचे प्रकार आणि कृषी रचनेची माहिती देत प्रकल्पातील सद्यस्थिती, प्रगती, आव्हाने आणि पुढील दिशा यावर सविस्तर सादरीकरण केले. प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी प्रकल्पाचे व्यापक उद्दिष्ट, रचना आणि टप्प्यांची माहिती दिली. त्यांनी हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम, गाव निवड समितीची जबाबदारी, ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजन, पाण्याचा ताळेबंद, मृद व जलसंधारण उपचार आणि हवामान–अनुकूल तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला.
सिंह यांनी सेंद्रिय व जैविक खतनिर्मिती, विविध पिकपद्धती, बियाणे संवर्धन, शेती शाळांचे महत्त्व, बांबू–वृक्ष लागवड, फळबाग विस्तार, जोडधंदे (मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग), पंपसंच–पाईप साहित्य आणि वैयक्तिक शेततळे यांसारख्या योजनांची अंमलबजावणी कशी वेगवान करावी, याबाबत मार्गदर्शन केले.
‘शेतकऱ्यांसाठी शाश्वत उपजीविका उपलब्ध करणे, हवामान–सजग शेतीचा विस्तार करणे आणि कृषी–आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे’ हे प्रकल्पाचे प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
प्रकल्प संचालक सिंह यांनी शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट आणि तरुण उद्योजकांपर्यंत प्रकल्पातील योजनांची माहिती प्रसारमाध्यमे, कार्यशाळा आणि गावसभांद्वारे प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, महाडीबीटी कार्यप्रणालीविषयी स्पष्टता देऊन अर्ज-प्रस्तावांची तात्काळ व वेळेत पूर्तता करण्याचे निर्देश दिले.
प्रकल्प राबवताना कोणताही विलंब होऊ नये यासाठी विभागीय व तालुका स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांना प्राप्त प्रस्तावांचे जलदगतीने निराकरण करण्याचे स्पष्ट आदेश कार्यशाळेत देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.



