
गडचिरोली : दारूचे व्यसन लागलेल्या रुग्णांना उपचाराची गरज असते, यासाठी मुक्तिपथतर्फे तालुका पातळीवर व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केले जाते. यास उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. नुकतेच विविध शहरात आयोजित शिबिराच्या माध्यमातून एकूण 45 रूग्णांनी उपचार घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांना व्यसन उपचार मिळणे शक्य झाले आहे. ही सुविधा मुक्तिपथ अभियानाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक गरजू रुग्णांनी उपचार घेऊन दारूच्या व्यसन सोडले आहे. मागील आठवड्यात देसाईगंज 9, सिरोंचा 3 मुलचेरा, 10, अहेरी 16 कुरखेडा 6 अशा एकूण 45 रुग्णांनी व्यसन उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञ समुपदेशक व मुक्तिपथ टीमतर्फे योग्य सल्ला दिला जातो. दारूच्या व्यसनाबद्दलची माहिती, शरीरावर होणारे दुष्परिणाम, काय करावे व काय करू नये याबाबतही माहिती देत औषोधोपचार केला जातो. विशेष म्हणजे, एकदा शिबिरातून उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित पाठपुरावा करून त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली जाते. यामुळे रुग्णांना दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यास मदत होते.



