गडचिरोलीविदर्भ

शैक्षणिक विकास आणि जनसेवा शेवटच्या श्वासापर्यंत करू – माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम 

राजे धर्मराव विद्यालयात पालक संपर्क मेळावा उत्साहात ; सेवानिवृत्त शिक्षक रमण कोम्मेरा यांचा सत्कार

सिरोंचा : “चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात शैक्षणिक क्रांती घडविण्याचे स्वप्न अहेरी इस्टेटच्या पूर्वजांनी पाहिले. तोच वारसा पुढे चालवत, शैक्षणिक विकास आणि जनसेवा मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन,” अशी ग्वाही माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.

सिरोंचा येथील राजे धर्मराव विद्यालयाच्या वतीने आयोजित पालक संपर्क मेळावा आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार अवधेशराव बाबा आत्राम, प्राचार्य गणेश तगरे, तसेच अनेक माजी शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी शाळेच्या इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले, “धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना कै. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी या भागातील अज्ञान दूर करण्यासाठी केली. त्यानंतर कै. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांनी या कार्याचा विस्तार केला. आज आधुनिक युगाची आव्हाने पेलण्यासाठी आम्ही शिक्षण संस्थांना अधिक सक्षम करत आहोत.”

आत्राम यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश तगरे यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळेच शाळा प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले. “पालकांनी शाळेवर जो विश्वास दाखवला आहे, तो आम्ही सार्थ ठरवू. तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास ती थेट मांडा, तिचे निराकरण तातडीने केले जाईल,” असे आश्वासनही त्यांनी पालकांना दिले.

या सोहळ्याचे औचित्य साधून विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक रमण कोम्मेरा यांचा अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कोम्मेरा यांनी दिलेल्या दीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य गणेश तगरे यांनी केले. या मेळाव्याला सिरोंचा परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामुळे पालक आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून, अहेरी इस्टेटच्या शैक्षणिक कार्याला नवीन उभारी मिळाल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button