
चार आरोपी ताब्यात ; सावरी येथे रावणवाडी पोलिसांची कारवाई
गोंदिया : जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असताना रावणवाडी पोलिसांनी ट्रक पकडला. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम सावरी येथील पेट्रोलपंपाजवळ शनिवारी (दि.११) रात्री ८:१० वाजता ही कारवाई करण्यात आली.
ट्रक क्रमांक एमएच ३७-टी ४५८७ मधून जनावरांची अवैधरीत्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून ग्राम सावरी येथील पेट्रोलपंपाजवळ या ट्रकला पकडले. ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये १७ जनावरे कोंबलेली दिसून आली. पोलिसांनी ट्रक व जनावरे जप्त केली असून, यासंदर्भात आरोपी ज्ञानेश्वर रामराव पांडुळे (३०), दिनेश दादाराव गव्हाणे (२८, दोघे रा. मंगरूळपीर, जि. वाशिम), तेजप्रतापसिंग जयसिंग ठाकूर (४८, रा. भद्रापूर, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम) व भरत श्यामलाल बागडे (२८, रा. चंगेरा) या चौघांवर प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम ११ (१) (ड), महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम कलम ५ (अ), ९ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस हवालदार संजय चौहान यांनी केली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अंबुरे करीत आहेत.



