गडचिरोलीविदर्भ

थरारक बचावकार्य! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वृद्धाचे वाचले प्राण

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कुरखेडा : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. याच पुराच्या तडाख्यात सोनेरांगी गावातील हरिदास बावनथळे (वय ६०) वाहून गेले, मात्र गावकऱ्यांनी केलेल्या थरारक बचावकार्यामुळे त्यांचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली, आणि घटनेचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मंगळवारी सायंकाळी हरिदास बावनथळे हे काही कामानिमित्त कढोली येथे गेले होते. परत येताना कढोली नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असतानाही त्यांनी तो पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्यांचे संतुलन सुटले आणि ते पुराच्या वेगात वाहून गेले. सुमारे अर्धा किलोमीटर वाहत गेल्यानंतर त्यांनी एका झाडाला पकडून स्वतःचा जीव वाचवला. ते दोन तासांपेक्षा अधिक काळ पुराच्या पाण्यात अडकून होते.

हरिदास बावनथळे पुराच्या पाण्यात अडकल्याचे पाहून गावकऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जीवाची पर्वा न करता, गावकऱ्यांनी दोरखंडाच्या मदतीने त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. या बचावकार्यात सोनेरांगीचे सरपंच बाबूराव कूमरे, पोलिस पाटील रुपेश नारनवरे, मोहन मडावी, अक्षय रणदिवे, राकेश मांदाळे, सोनू दखने यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी अथक प्रयत्न केले.

या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यातून रस्ते किंवा नाले पार न करण्याचे आवाहन केले आहे. गावकऱ्यांनी दाखवलेल्या या शौर्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button