
मुक्तिपथ व पोलिसांची संयुक्त कृती
चामोर्शी : तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राअंतर्गत अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या रेखेगावात पोलिस व मुक्तिपथने संयुक्त अहिंसक कृती केली. यात दारूविक्रेत्यांच्या घरातून ६ ड्रम मोहफुलाचा सडवा व १० लिटर दारू जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनिता गावडे व गीता दशरथ कुमोटी असे आरोपींचे नाव आहेत.
रेखेगाव हे गाव तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असून हे गाव अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध आहे. सदर गावात दारू पिण्यासाठी ५ ते ६ गावातील लोकांची नेहमीच गर्दी असते. इतर गावातील लोकांच्या तक्रारीवरून संबंधित गावातील काही विक्रेत्यांवर पोलिस विभागाने गुन्हे दाखल केले. तरीसुद्धा गावातील मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. या गावातील विक्रेत्यांविरोधात पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत विक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता वनिता गावडे व गीता कुमोटी यांच्या घरातून सहा ड्रम मोहफुलाचा सडवा व १० लिटर मोहफुलाची दारू मिळून आली. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस विभागाचे मंडल, रॉय, होमगार्ड व मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम, विनोद पांडे यांनी केली.



