क्राईमगडचिरोलीविदर्भ

अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने दारूची वाहतूक व विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गडचिरोली पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार, गडचिरोली पोलीस स्टेशनच्या पथकाने पारडी नाका येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे.

नगर परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारडी नाका येथे स्थिर सर्वेक्षण पथक (SST) तैनात असताना, पहिली कारवाई २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. तानाजी नानाजी पेंदोरकर (वय ३४, सध्या रा. व्याहाड बु., जि. चंद्रपूर) हा आपल्या निळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीच्या पेट्रोल टाकीत छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. दुचाकीच्या टाकीतून रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या ४० सिलबंद बाटल्या आणि तस्करीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण ₹ ८६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध पो. स्टे. गडचिरोली येथे गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

दुसरी कारवाई २२ नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी करण्यात आली. चंद्रपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांची तपासणी करत असताना, एका वयस्कर महिलेवर पोलिसांना संशय आला. ललीता सुधाकर महामंढरे (वय ६५, रा. रामनगर वॉर्ड क्र. १९, गडचिरोली) ही महिला अंगावर घातलेल्या जॅकेटमध्ये छुप्या पद्धतीने देशी दारूची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. जॅकेटमधून रॉकेट संत्रा देशी दारूच्या ९० निपा आणि एक साधा मोबाईल फोन असा एकूण ₹ १०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. पुढील तपास पोउपनि. शिवाजी देशमुख आणि मपोउपनि. पुजा नैताम करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button