
गडचिरोली : मुक्तीपथ चमू, पोलीस विभाग व गाव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा तालुक्यातील शिवटोला, अरततोंडी येथे अहिंसक कृती करण्यात आली. या धाडीमध्ये अवैध मोहफुलाची दारू आणि दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आले असून, 2 दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवटोला येथील संशयास्पद घरांची तपासणी केली असता एका घरातून ३० लिटर तयार मोहाची दारू जप्त करण्यात आली. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा गावालगत असलेल्या शेतशिवाराकडे वळवला. शेतशिवारात शोधमोहीम राबवली असता, विविध ठिकाणी लपवून ठेवलेला दारू गाळण्याचा साठा पथकाच्या हाती लागला. यामध्ये ८ मडके मोह सडवा, २ मोठे ड्रम मोह सडवा, १ बकेट मोह सडवा, १ लोखंडी मोठा ड्रम, दारू मध्ये टाकण्याचा गूळ यासोबतच दारू गाळण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी अवैध दारूविक्री व निर्मिती करणाऱ्या 2 विक्रेत्यांवर पोलीस विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक ताराम, मुक्तीपथचे सहसंचालक संतोष सावळकर, पोलिस पाटील मीनाक्षी शेडमाखे, दारू बंदी समितीच्या अध्यक्ष तन्वी गेडाम, मुक्तीपथचे तालुका प्रभारी संघटक शारदा मेश्राम, तालुका प्रेरक जीवन दहिकर व स्पार्क कार्यकर्ता अतुल पोरटे तसेच राकेश ढवळे उपस्थित होते. “गावातील अवैध दारू आणि व्यसनाधीनता मोडीत काढण्यासाठी अशा प्रकारच्या अहिंसक कारवाया यापुढेही सुरूच राहतील,” त्यामुळे विक्रेत्यांनी तत्काळ अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन मुक्तीपथ गाव संघटनेच्या वतीने करण्यात आले.



