
गडचिरोली : दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणारी कार चुकीच्या दिशेने गेली. दरम्यान, सदर कार काळी-पिवळीला धडकल्याने काळी-पिवळी वाहन उलटले. सुदैवाने या भीषण अपघातात वाहनातून प्रवास करणारे १३ प्रवासी थोडक्यात बचावले. मात्र, या अपघातात तीनजण किरकोळ जखमी झाले. ही घटना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर नाल्याच्या पुलावर मंगळवार, २५ जून रोजी दुपारी घडली.
एमएच ३३ एम ५००२ क्रमांकाचे काळी-पिवळी वाहन १३ प्रवासी घेऊन गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात होते; तर एमएच ३३ व्ही ५६१७ क्रमांकाचे वाहन चामोर्शीवरून गडचिरोलीकडे येत होते. दरम्यान, गोविंदपूर नाल्याच्या पुलावर एक दुचाकीस्वार काळी-पिवळीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एकदम समोर आला. त्यामुळे काळी-पिवळी वाहनचालकाचे नियंत्रण सुटून वाहन दुसऱ्या बाजूला गेले. त्यातच समोर येणाऱ्या चारचाकीची काळी-पिवळी वाहनाला समोरासमोर धडक बसली. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.



