
आश्वासित प्रगती योजनेच्या थकीत बिलासाठी मागितली ५ हजारांची लाच ; मुख्याध्यापिकेसह परिचरावर गुन्हा दाखल
गोंदिया : शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील श्री विद्या गर्ल्स हायस्कूलमध्ये आश्वासित प्रगती योजनेच्या बिलाचा फरक काढून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना शाळेच्या परिचराला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह परिचरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत मुख्याध्यापिका अजया जागेश्वर चुटे (४३) आणि परिचर देवराज अनंतराम चिंधालोरे (५८) यांना आरोपी करण्यात आले आहे. तक्रारदार हे याच शाळेत १९९७ पासून परिचर पदावर कार्यरत आहेत. त्यांची जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या १६ महिन्यांच्या ‘सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजने’च्या लाभाच्या फरकाची थकीत बिले मंजूर करायची होती. ही बिरे काढून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापिका अजया चुटे यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
ठरल्याप्रमाणे, ५ हजार रुपयांपैकी २ हजार रुपये परिचर देवराज चिंधालोरे याच्यामार्फत स्वीकारण्याचे आणि उर्वरित ३ हजार रुपये पगार झाल्यावर देण्याचे ठरले होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने गोंदिया लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, मुख्याध्यापिकेने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी पथकाने शाळेतच सापळा लावला. मुख्याध्यापिकेच्या संमतीने देवराज चिंधालोरे याने जसे २ हजार रुपये स्वीकारले, तसे दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध सालेकसा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, गोंदियाच्या पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या पार पाडली.



