कृषीगडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीतील ५ प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड

युरोप, इस्रायल, जपानसह आशियाई देशांमध्ये दौरा ; दोन कृषी पुरस्कार विजेत्यांचा समावेश

गडचिरोली : जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्याच्या कृषी विभागामार्फत पाच प्रगतशील शेतकऱ्यांची निवड विदेश अभ्यास दौऱ्यासाठी करण्यात आली आहे. या निवड झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दोन महाराष्ट्र राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि तीन प्रगतशील शेतकरी यांचा समावेश आहे.

या अभ्यास दौऱ्याचा उद्देश परदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञान, जलसंधारण प्रणाली, सेंद्रिय शेती आणि कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा आहे. शेतकरी प्रतिनिधी मंडळ युरोप, इस्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशांमध्ये दौरा करणार आहे. हे शेतकरी अत्याधुनिक सिंचन तंत्र, हरितगृह शेती, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करतील.

या दौर्‍यासाठी कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील परशुराम कोमाजी खुणे, गडचिरोली तालुक्यातील पारडी कुपी येथील चंद्रशेखर रामदास मुरतेली, गडचिरोली शहरातील बाळकृष्ण असुराज टेंभुर्णे आणि अरुण केवलराम हरडे तसेच वडसा तालुक्यातील आमगाव येथील विनोद रामचंद्र जक्कनवार या पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी परशुराम खुणे, चंद्रशेखर मुरतेली आणि अरुण हरडे यांची युरोप दौर्‍यासाठी, विनोद जक्कनवार यांची जपान दौर्‍यासाठी, तर बाळकृष्ण टेंभुर्णे यांची मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांच्या अभ्यास दौर्‍यासाठी निवड झाली आहे.

कृषी विभागाने निश्चित निकषांनुसार आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या आणि उत्पादनवाढ साधणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली असून, या पाच शेतकऱ्यांच्या अनुभवाचा लाभ जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक शेतीला मिळणार बळ

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी सांगितले की, “गडचिरोली हा शेतीच्या दृष्टीने आव्हानात्मक जिल्हा असला तरी येथील शेतकऱ्यांनी नवकल्पकतेतून उत्तम प्रगती साधली आहे. या विदेश दौऱ्यामुळे त्यांना जागतिक शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल आणि त्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शेतीत नव्या संधी निर्माण होतील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button