
कुटुंबीय रोवणीच्या कामासाठी शेतात गेले असताना घरात घेतला गळफास
भंडारा : सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील एका ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उमेश सिताराम बगमारे (वय ३७) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून २६ जुलै रोजी ही घटना घडली.
मृत उमेश बगमारे यांच्याकडे अवघी तीन एकर शेती होती. मात्र, मागील काही वर्षांपासून निसर्गाची साथ न मिळाल्याने शेतात सातत्याने नापिकी होत होती. शेतीतून मिळणारे उत्पन्न घटल्याने त्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर साचला होता. कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होते.
रविवारी (दि. २६) सकाळी उमेश यांची आई व पत्नी धान रोवणीच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याची संधी साधून उमेश यांनी राहत्या घरातील आतल्या खोलीत पंख्याला दुपट्ट्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच दिघोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. सततची नापिकी आणि कर्जाच्या तणावातूनच उमेश यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या या अकस्मात जाण्याने बोथली गावात व परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.



