
जिल्हा न्यायालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा‘ उत्साहात
गोंदिया : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदियाच्या वतीने जिल्हा न्यायालय परिसरातील मल्टीपरपज हॉलमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मराठी भाषेचा वारसा जपण्यासाठी आणि तिचा दैनंदिन कामकाजात वापर वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर.एन. जोशी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी भाषेच्या समृद्धीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन राहिलेली नसून ती आता खऱ्या अर्थाने संवादातील मुख्य भाषा बनली आहे. मराठीला नुकताच लाभलेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इतर भाषांच्या तुलनेत मराठीची शब्दरचना आणि गोडवा वैशिष्ट्यपूर्ण आहे.”
यावेळी एस.एस. गर्ल्स कॉलेजच्या प्रा.डॉ. दिशा गेडाम यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून न्यायिक अधिकारी, वकील आणि कर्मचाऱ्यांना मराठी भाषेच्या वापराबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या मराठी कविता. या कवितांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एम.के. सोरते यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्याला जिल्ह्यातील विविध न्यायिक अधिकारी, कर्मचारी आणि वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सुचिता लढे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ॲड. प्रिती तुरकर यांनी मानले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.



