गडचिरोलीविदर्भ

नारी शक्तीतूनच राष्ट्र शक्तीची भव्य निर्मिती – माजी आ. कृष्णा गजबे

देसाईगंज येथे भाजपच्या दोनदिवसीय ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण’ कार्यशाळेचा समारोप

देसाईगंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांचे सक्षमीकरण आणि सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जेव्हा नारी शक्ती सक्षम होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्र शक्तीची भव्य निर्मिती होईल, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

देसाईगंज शहर मंडलातर्फे आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६’ अंतर्गत दोनदिवसीय निवासी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. वन कर्मचारी पतसंस्था सभागृहात १० आणि ११ एप्रिल रोजी हे शिबिर उत्साहात पार पडले. या दोन दिवसीय कार्यशाळेत एकूण सात महत्त्वपूर्ण सत्रांद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले: इतिहास आणि विकास: जिल्हा कायमनिमंत्रित सदस्य रामभाऊ पडोळे यांनी भाजपचा संघर्षमय प्रवास आणि पक्ष विस्तारावर प्रकाश टाकला. मतदार नोंदणी (SIR): जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी मतदार नोंदणी आणि पुनरावलोकनाचे विशेष तंत्र शिकवले. संघटन विस्तार: माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी संघटन कौशल्य वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले. वैचारिक अधिष्ठान: जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानववाद’ तत्त्वज्ञानाची मांडणी केली. बुथ व्यवस्थापन: नगरसेवक भारत बावनथडे यांनी बुथ स्तरावरील सूक्ष्म नियोजनाचे धडे दिले. डिजिटल प्रचार: नरेश विठ्ठलानी यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि ‘ए आय नमो’ व ‘सरल ॲप’च्या वापराबाबत प्रशिक्षण दिले.

पाचव्या सत्रात बोलताना कृष्णा गजबे यांनी केंद्र सरकारच्या योजनांची आकडेवारी मांडली. ते म्हणाले की, उज्ज्वला योजनेतून १०.५१ कोटी महिलांना धूरमुक्त केले, मुद्रा योजनेतून विनाहमी कर्ज देऊन तरुणांना उद्योजक बनवले. आरोग्य क्षेत्रात एम्सची संख्या ७ वरून २२ झाली असून, कोविड काळात २२० कोटी लसींचे डोस देऊन भारताने जगासमोर आदर्श ठेवला आहे. ई-श्रम पोर्टलद्वारे ३१ कोटी असंघटित कामगारांना सुरक्षितता प्रदान केल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस भरतीत निवड झालेल्या स्थानिक उमेदवारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या शिबिराला किसन नागदिवे, सदानंद कुथे, रामभाऊ पडोळे, मोतीलाल कुकरेजा, राजूभाऊ जेटानी, सचिन वानखेडे, नगराध्यक्षा लता सौंदरकर, नगर उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराध्यक्ष सचिन खटकाटे यांनी प्रास्ताविक केले, विलास ढोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिन वानखेडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने या यशस्वी कार्यशाळेची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button