गडचिरोलीविदर्भ

माजी आ. स्व. नामदेवराव पोरेड्डीवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘परंपरा लोकहिताची’ स्मरणिकेचे प्रकाशन

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला समर्पित नेत्याच्या कार्याचे स्मरण; जिल्हा गौरव पुरस्कार आणि वाघाच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मदतवाटप

गडचिरोली : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करणारे, दिवंगत माजी आमदार स्व. नामदेवराव बालाजी पोरेड्डीवार यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘परंपरा लोकहिताची’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीतही समाजासाठी मोठे कार्य करणाऱ्या पोरेड्डीवार यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मुख्य कार्यालय, गडचिरोली येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार, २५ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता श्रावण महिन्याच्या शुभारंभात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकार महर्षी अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार यांनी भूषवले. स्मरणिकेचे प्रकाशन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या शुभ हस्ते झाले.

यावेळी जिल्हा बँकेतर्फे सन २०२४-२५ चा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ दादाजी सीताराम चुधरी यांना देऊन गौरवान्वित करण्यात आले. तसेच, वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रमही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या सोहळ्याला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलींद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, कर्नल विक्रम मेहता, भाग्यवान खोब्रागडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, सचिव अनंत साळवे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, सहकार महर्षी तथा गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांचा वाढदिवस असल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत नेते माजी आमदार स्व. नामदेवराव बालाजी पोरेड्डीवार यांनी स्वीकारलेले जनसेवेचे व्रत अविरत पुढे चालत राहावे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजकार्याला गती देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button