
पोलीस दलाच्या वतीने आयोजन ; मोफत सहायक उपकरणे व सरकारी योजनांचा लाभ
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने आपल्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ अंतर्गत ‘प्रोजेक्ट उडान’ या विशेष उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत, भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या मदतीने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवसांचे सहायक उपकरणे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यात १,३०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यांना मोफत सहायक उपकरणे वितरित केली जाणार आहेत.
हे शिबिर ‘भारत कृत्रिम अंग निर्माण निगम’ (एलिम्को), मुंबई यांच्या सहकार्याने ११ सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील एकलव्य हॉलमध्ये आणि १२ सप्टेंबर रोजी पोलीस उप-मुख्यालय, प्राणहिता येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात वैद्यकीय पथकाने ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक अडचणींची तपासणी केली. यात गडचिरोलीच्या उत्तर विभागातून ८५० आणि दक्षिण विभागातून ४५० अशा एकूण १,३०० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

तपासणीनुसार, या सर्व नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार विविध उपकरणे मोफत दिली जाणार आहेत. यात व्हीलचेअर, चालण्याची काठी, वॉकर, श्रवणयंत्र, कुबड्या, कमरेचा पट्टा यांसारख्या साहित्याचा समावेश आहे. या उपकरणांमुळे त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सोपे होईल. या व्यतिरिक्त, एकूण २०७ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले विविध उपकरणे वाटप केल्याने त्यांच्या जीवनाला एक नवीन सुरुवात मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यात नक्कीच मदत होणार आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांच्या सर्व समस्या दुर व्हाव्यात यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल राहिल. ज्येष्ठ नागरिकांच्या छोट्यात छोट्या समस्या सोडविण्यासाठी देखील गडचिरोली पोलीस दल नेहमीच तत्पर आहे, असेही ते म्हणाले.
शिबिरादरम्यान अपर पोलीस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी, अजय कोकाटे, तसेच पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनिल मडावी, जिल्हा सामान्य रुग्नालय गडचिरोलीचे ऑडीओलॉजीस्ट डॉ. संदिप मोटघरे, एलिम्को, मुंबईचे डॉ. संकेत डेरवणकर, ऑर्थोटिक्स अँड प्रोस्थेटिक्स हर्ष विश्रवकर्मा, कॅम्प कॉर्डिनेटर विकास कुमार, इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग, हे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.



