
साकोली तालुक्यातील घटना ; वनविभागाच्या पिंजऱ्यांकडे वाघाची पाठ
साकोली : “आईवर काळाने झडप घातलेली पाहताच, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एका १७ वर्षीय मुलाने वाघासमोर उभे ठाकून त्याला पळवून लावले.” साकोली तालुक्यातील आमगाव (बु.) येथील शेतशिवारात गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अंगावर शहारे आणणारा थरार घडला. आपल्या आईला मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या तन्मय मुंगमोडे याच्या धाडसाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
आमगाव (बु.) येथील छाया सुधाकर मुंगमोडे (४३) या आपला मुलगा तन्मयसोबत दुचाकीने शेतात गेल्या होत्या. शेतात पोहोचल्यावर तन्मय थोडा पुढे चालत होता, तर छाया काही अंतरावर मागे राहून सरपण (जळाऊ लाकडे) गोळा करत होत्या. याच संधीचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक छाया यांच्यावर झडप घातली. वाघाने त्यांच्या मानेला आणि कानाला पकडून गंभीर जखमी केले.
आईवर वाघाने हल्ला केल्याचे लक्षात येताच तन्मय डगमगला नाही. त्याने आरडाओरड करत आणि मोठ्याने किंचाळत थेट वाघाच्या दिशेने धाव घेतली. एका १७ वर्षांच्या मुलाचा हा रुद्रावतार पाहून वाघही भांबावला आणि छाया यांना सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेला. तन्मयने केवळ वाघाला पळवूनच लावले नाही, तर जखमी आईला तत्काळ दुचाकीवर बसवून घर गाठले. तेथून त्यांना चारचाकीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जखमा गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने नागपूरला रेफर करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांपासून या भागात वाघाचा वावर असल्याने वनविभागाने पिंजरे लावले आहेत आणि मचाणही उभारले आहे. मात्र, वाघ प्रशासनाला हुलकावणी देण्यात यशस्वी ठरत आहे. २८ मार्च रोजी ज्या ठिकाणी घटना घडली होती, त्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ही तिसरी घटना घडल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
“तन्मयने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आज एका माऊलीचे प्राण वाचले आहेत.” मात्र, या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाने या नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी लावून धरली आहे.



