
डांभेविरली शेतशिवारातील घटना
लाखांदूर : शेतशिवारात जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर रानगव्याने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाल्याची घटना २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास डांभेविरली शेतशिवारात घडली. गुरुदेव श्रावण बुराडे (५५) असे जखमी गुराख्याचे नाव आहे.
गुराखी गुरुदेव मागील काही वर्षांपासून पशुपालन आणि शेळीपालन करीत आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी जनावरे शेतशिवारात चरण्यासाठी शेतशिवारात सोडले होते. यादरम्यान अचानक आलेल्या रानगव्याने गुरुदेववर हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना शेतशिवारातील अन्य शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून रानगव्याला हुसकावून लावले. गुराख्याला उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. लाखांदूर वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक महेश मंजलवाड यांनी रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला.



