
भंडारा : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त (१० डिसेंबर) महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कारागृहातील बंद्यांना त्यांचे मानवी हक्क आणि संरक्षणाबाबत जाणीवजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
हा कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या सहमतीने आणि महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लिना फलके (निवासी जिल्हाधिकारी, भंडारा), काळे (उपविभागीय अधिकारी, भंडारा) आणि मिलिंदकुमार वि. बुराडे (वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा) उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी बंद्यांना असलेल्या विविध मानवी हक्कांबद्दल माहिती दिली, तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायदेशीर तरतुदींबद्दल मार्गदर्शन केले. ॲड. तुरकर आपल्या भाषणातून कैद्यांच्या जगण्याच्या अधिकाराविषयी, जीवित्वाची सुरक्षा आणि कायदेविषयक मदत याबद्दल मार्गदर्शन केले. निवासी जिल्हाधिकारी लिना फलके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बंद्यांना कारागृहात शिस्तबद्ध वर्तन ठेवण्याचे आणि कायद्याच्या नियमांचे पालन करण्याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात एकूण ३१५ बंद्यांनी सहभाग घेतला. कारागृह अधिकारी डी. एस. आहे (अधीक्षक, भंडारा जिल्हा कारागृह) यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तर ॲड. गभणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डी. एस आहे यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.



