गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

लेडी ड्रायव्हर ‘किरण’ नामांकित कंपनीत बनणार ऑफिसर

इंग्लंडमध्ये घेतले ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’चे शिक्षण  

गडचिरोली : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम व घनदाट जंगल असलेल्या रेगुंठा येथील किरण रमेश कुर्मावार यांना राज्य शासनाने उच्च शिक्षणासाठी ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली होती. त्यानंतर किरण यांनी इंग्लंड देशातील लंडनमध्ये ‘इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना आता हैदराबाद येथील नामांकित कंपनीत प्लेसमेंट ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळणार आहे. दुर्गम डोंगरदऱ्यांतून थेट लंडनपर्यंतचा किरणचा प्रवास प्रेरणादायी आहे.

रेगुंठा येथील किरण रमेश कुर्मावार यांनी ‘एमए’ पर्यंतचे शिक्षण घेतले होते. विपरीत आर्थिक स्थितीमुळे त्या स्वमालकीची टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. त्यानंतर अनेक पुरस्कार किरण यांना मिळाले होते. उच्च शिक्षण घेण्याबाबतची किरणची धडपड तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी सामाजिक न्याय विभागातर्फे किरणला परदेशात शिक्षणासाठी ४० लाखांची शिष्यवृत्ती मंजूर केली. लंडन येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स’मध्ये ‘इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ ह्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला. आता त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. हैदराबाद येथे नामांकित कंपनीत प्लेसमेंट ऑफिसरपदी त्यांना नियुक्ती मिळालेली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी किरण कुर्मावार यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

रेगुंठा हे गाव सिरोंचापासून सुमारे ६० किमी अंतरावर आहे. किरण यांनी तेलंगणा राज्यातील हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात एम.ए केले. शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराचे साधन म्हणून त्यांनी रेगुंठा ते सिरोंचादरम्यान काळीपिवळी प्रवासी वाहन चालविण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडे तीन प्रवासी वाहने होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button