
मुलचेरा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान उत्साहात; कार्यकर्त्यांना ‘राष्ट्र प्रथम‘ या मूलमंत्रासह दिले प्रभावी मार्गदर्शनाचे धडे
मुलचेरा : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने भारत देश आज विकासाच्या महामार्गावर आहे. मात्र, २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याची सक्रिय भूमिका आणि समर्पण अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
मुलचेरा येथील स्वामी विवेकानंद छात्रावास येथे आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी शिस्त आणि निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीत ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हाच आमचा मूलमंत्र आहे. कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता समाजसेवा, तळागाळातील लोकांशी संवाद आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे.”
देशभरात राबविल्या जाणाऱ्या या महाप्रशिक्षण अभियानाचा उद्देश कार्यकर्त्यांना अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करणे हा आहे. संघटन बळकट करण्यासाठी आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रशिक्षण मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे युवा नेते अवधेशराव बाबा आत्राम, महामंत्री प्रकाश गेडाम, उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, जिल्हा सचिव सुभाष गणपती, युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश गारघाटे, तालुकाध्यक्ष संजीव सरकार, माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, नगरसेवक आशिष पिपरे, प्रदेश सरचिटणीस रेखा डोळस, निखिल हलदार, दिलीप आत्राम, बादल शाह, विजय बिश्वास, उत्तम शर्मा, अशोक बडाल, मोंटू सरकार आणि तपन मल्लिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आधुनिक जनसंपर्क तंत्र, सोशल मीडियाचा वापर आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचवावी, याचे तांत्रिक व वैचारिक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलचेरा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आगामी काळात मुलचेरा परिसरात पक्ष बांधणी अधिक वेगाने होणार असल्याचे चिन्हे दिसत असून, कार्यकर्त्यांनी ‘गाव तिथे भाजपा’ हा संकल्प अधिक दृढ केला आहे.



