
‘गावात दारूविक्री बंद करा, पोलीस विभाग पूर्ण सहकार्य करेल’ – प्रभारी अधिकारी आकाश नायकवाडी
गडचिरोली : दुर्गम कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या धानोरा, आरमोरी आणि कुरखेडा तालुक्यातील गावांमध्ये अवैध दारूविक्री बंदीसाठी पोलीस विभाग आणि मुक्तिपथतर्फे पोलीस पाटलांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
मालेवाडा येथे आयोजित या बैठकीत पोलीस मदत केंद्र हद्दीतील एकूण ४७ पोलीस पाटलांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रभारी अधिकारी आकाश नायकवाडी यांनी दारूविक्री बंदी समस्येबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वप्रथम पोलीस पाटील आणि गावसंघटनांनी आपल्या पातळीवर दारूविक्री बंदीसाठी पूर्ण प्रयत्न करावेत, यासाठी पोलीस विभाग आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे उपस्थित सर्व पोलीस पाटलांना सांगितले. दारू पिऊन कुणी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्याची ताकीदही त्यांनी पोलीस पाटलांना दिली. नायकवाडी यांनी पोलीस पाटलांना त्यांचे अधिकार, कार्य आणि जबाबदाऱ्या समजावून सांगून त्यांची जागृती केली.
मुक्तिपथतर्फे तालुका संघटक शारदा मेश्राम यांनी दारूविक्री बंदीसाठी पोलीस पाटलांनी कोणती कृती केली पाहिजे, याबाबत सविस्तर माहिती दिली. गाव संघटनेच्या महिलांना पाठिंबा देऊन त्यांचा उत्साह वाढवणे, दारू विक्रेत्याला सूचना देऊनही तो न ऐकल्यास वरिष्ठांना तक्रार करणे, गावातील प्रमुख व सक्रिय युवक-व्यक्तींची मदत घेणे, गावात अहिंसक कृती करणे, गावामध्ये शांतता राखण्यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव संमत करणे आणि आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंद करणे इत्यादी कृतींबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. ज्या गावात दारू विक्री बंद असते, त्या गावात पोलीस पाटलांचे काम कसे सोपे होते आणि गावात तंटे कमी दिसतात, यासाठी काही गावांची उदाहरणे देऊन दारूविक्री बंदीचे महत्त्व पटवून दिले.
तालुका प्रेरक जीवन दहीकर यांनी व्यसन उपचार शिबिरांची माहिती दिली. उपचाराची गरज असलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गावाला दारूमुक्त कसे करता येईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सहभागी झालेल्या ४७ पोलीस पाटलांनी आपापल्या गावांना दारूमुक्त करण्यासाठी कृती करण्याची तयारी दर्शवली. ही बैठक अवैध दारूविक्री रोखण्यासाठी आणि गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.



