
केवळ २५ रुपयांत नोंदणी; कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा
गडचिरोली : आर्थिक अडचणींमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही गरजू विद्यार्थ्याला उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उदात्त उद्देशाने गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी पदव्युत्तरच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ‘निशुल्क प्रवेश’ दिला जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून हा कौतुकास्पद उपक्रम २०२२ पासून अविरतपणे सुरू असून, यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
विद्यापीठाच्या या विशेष योजनेअंतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही भरमसाठ प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. विद्यार्थ्यांकडून केवळ नाममात्र २५ रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार असून, उर्वरित संपूर्ण प्रवेश शुल्क माफ करण्यात आले आहे. “शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून आर्थिक परिस्थिती हा त्यामधील अडथळा ठरू नये,” याच सामाजिक बांधिलकीतून हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गोंडवाना विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम वातावरण आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये भव्य ग्रंथालय आणि अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा. प्रगत संशोधन केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. विद्यापीठाच्या वतीने निशुल्क शैक्षणिक सहलींचे आयोजन. क्रीडा व शारीरिक शिक्षणासाठी विशेष प्रोत्साहन आणि विविध शासकीय-निमशासकीय शिष्यवृत्ती योजना. बाहेरगावाहून येणाऱ्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित वसतिगृहाची उत्तम सोय.
विद्यापीठाने घेतलेल्या या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आपली उच्च शिक्षणाची वाटचाल अखंड सुरू ठेवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी खालील प्रमुखांशी संपर्क साधावा: डॉ. उत्तमचंद कांबळे (अध्यक्ष, प्रवेश समिती) – भ्रमणध्वनी: ९५९५६९३३७३, डॉ. उमेश लिखार (अधीक्षक, पदव्युत्तर शैक्षणिक विभाग) – भ्रमणध्वनी: ७६२०७७७०१८



