
दोन ट्रक आणि पायलट कार जप्त; तेलंगणा, झारखंड, गुजरातसह स्थानिक आरोपींचा समावेश; गुन्हे शाखेची मूल रोडवर धडक कारवाई
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध जनावरांच्या तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवत एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. मूल रोडवरील एम.ई.एल. नाका परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६३ जनावरांची सुटका केली असून, तब्बल ५८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना अवैध जनावरांच्या वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मूल रोडवरील नाक्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी दोन संशयास्पद मोठे ट्रक आणि त्यांना ‘पायलटिंग’ करणारी एक पांढऱ्या रंगाची कार अडवण्यात आली. ट्रकमध्ये डोकावून पाहिले असता, त्यामध्ये अत्यंत निर्दयीपणे आणि दाटीवाटीने ६३ जनावरे भरल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत दोन मोठे ट्रक (क्रमांक MH 34 AV 0379 आणि TS 07 UG 3645) आणि एक कार. ६३ गोवंश (यांना सुरक्षिततेसाठी चंद्रपूरच्या ‘प्यार फाउंडेशन’ येथे जमा करण्यात आले आहे). ५ मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
या प्रकरणात शेख हाशेम शेख मोला (२७, तेलंगणा), मोसीन बेग मुबारक बेग (२९, तेलंगणा), शेख अन्सारी अशरफ मिया (३०, झारखंड), समीर खान करीब खान (१८, गडचांदूर), शेख जुनेद साबीर हुसेन (१९, गुजरात), यांच्यासह इम्रान कुरेशी, सादीक कुरेशी, आवेश कुरेशी (सर्व रा. गडचांदूर), सोहल (राजुरा), आणि वसीम कुरेशी (चंद्रपूर) अशा एकूण ११ जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. सध्या रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



