कृषीगडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ सुरू: शेतीतज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

१५ दिवसांच्या अभियानांतर्गत १२ तालुक्यांतील ९० गावांमध्ये कृषी यात्रा; जयरामपूर, गणपूर रै. आणि लक्ष्मणपूर येथे शास्त्रज्ञांशी थेट संवाद

गडचिरोली : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्रांती घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पाऊल उचलत आहे. याच अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने देशभरात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २९ मे ते १२ जून या काळात १५ दिवसांचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

या अभियानानिमित्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असून, कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासह नव्या पीक प्रकार आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. या १५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कृषी यात्रा काढण्यात येणार असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील ९० गावांमध्ये ही कृषी यात्रा भ्रमण करणार असून, शास्त्रज्ञ तेथील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

४ जून रोजी, या अभियानाचा एक भाग म्हणून जयरामपूर, गणपूर रै. आणि लक्ष्मणपूर (ता. चामोर्शी) येथे कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली आणि कृषी विभाग, गडचिरोली यांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर आणि एमएएफएसयू (MAFSU) येथील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ. मुकुंद कदम (MAFSU) यांनी शेतीशी निगडित व्यवसाय, त्यातील सुधारित पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि पावसाळ्यापूर्वी त्यांचे लसीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. प्रवीण महातले यांनी धान लागवड तंत्रज्ञान, धानाचे विकसित वाण, खत व्यवस्थापन, तसेच तूर, कापूस आणि सोयाबीन पीक लागवड तंत्रज्ञान यावर माहिती दिली. डॉ. जॉय दास (प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस अनुसंधान, नागपूर) यांनी शेतकऱ्यांना कापूस आणि धान लागवडीवर मार्गदर्शन करताना, विविध पीक पद्धती, विद्यापीठाचे वाण आणि शेतीचे आरोग्य सुधारण्याचे आवाहन केले. सोबतच, जिल्ह्यात नैसर्गिक शेतीचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले. अमित तुमडाम (तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग) यांनी शेतकऱ्यांना विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. पी. पी. गजभिये (मंडळ कृषी अधिकारी, आष्टी) यांनी फळबाग लागवड आणि तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. पुष्पक बोथीकर (वि. वि. पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली) यांनी खरीप हंगामातील पिकांवर येणारे कीड व रोग व्यवस्थापनावर विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कदम यांनी पशुपालन (कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय) यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी आष्टी पी. पी. गजभिये, तालुका कृषी अधिकारी, चामोर्शी अमित तुमडाम, जयरामपूर येथील सरपंच दिपाली एस. सोयाम, छाया भोयर (उपसरपंच), गणपूर रै. येथील जीवनदास भोयर (उपसरपंच), व लक्ष्मणपूर येथील कार्यक्रमात सुरेश चोखरे (पोलीस पाटील), गणेश सोमणकर (कृषी सहायक, अनकोडा), लक्ष्मण काकडे (कृषी सहायक) आणि तिन्ही गावातील महिला, शेतकरी व कृषी विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना धान पीक लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया कशी करावी, याचे प्रत्यक्षिक करून दाखवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button