गडचिरोलीविदर्भ

टायगर ग्रुपतर्फे ‘व्यसन आणि आजचा युवा’ विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम

विद्यार्थ्यांना समजावले व्यसनाचे दुष्परिणाम

आलापल्ली : श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने टायगर ग्रुप, आलापल्लीने ‘व्यसन आणि आजचा युवा’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. यासाठी अहेरी मुक्तिपथ तालुका चमूला आमंत्रित करण्यात आले होते, ज्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून व्यसनमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात मुक्तिपथचे तालुका संघटक गणेश बोरकर आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्यसनामुळे आरोग्य, मानसिक आणि सामाजिक स्तरावर होणारे गंभीर परिणाम त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन व्यसनी आणि व्यसनमुक्त जीवनातील फरक स्पष्ट केला.

मार्गदर्शकांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुचवले : व्यसनी मित्रांच्या संगतीपासून दूर राहा. व्यसनाचे पदार्थ कोणी फुकट देत असल्यास ‘नाही’ म्हणायला शिका. स्वतः व्यसन न करण्याचा संकल्प करा आणि मित्रांनाही व्यसन सोडायला सांगा. घरातील दारू आणि तंबाखूचे व्यसन करणाऱ्या पालकांनाही ते सोडायला सांगा.

या मार्गदर्शन सत्रात जवळपास ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ घेतली आणि कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. दारू पिणाऱ्या व्यक्तींना मुक्तिपथच्या क्लिनिकमध्ये आणून उपचार करण्याची माहितीही यावेळी देण्यात आली. टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये व्यसनांविरोधात जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button