दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द ; २३ कृषी सेवा केंद्र निलंबित
कृषी विभागाची धडक कारवाई

गडचिरोली : नियमानुसार रासायनिक खते, बियाणांची विक्री न करणे, स्टॉक बुक न बाळगणे व रेट बोर्ड न लावणे, आदींसह अनियमितता विविध प्रकारची आढळलेल्या जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर २६ जून रोजी तपासणी करून २७ जून रोजी कारवाई करण्यात आली. यात दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले, तर २३ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. गडचिरोली तालुक्यातील नवेगाव, गडचिरोली शहरातील सहा, तसेच पोटेगाव, मुरमाडी, वसा, अडपल्ली, काटली, जेप्रा, चुरचुरा, खुर्सा, माडेतुकूमचे दोन, आदी एकूण १८ कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून तपासणी केली. त्यानंतर सदोष व अनियमितता आढळलेल्या केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून नमुने घेतले जात आहेत. यानुसार गडचिरोली व देसाईगंज तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. यात अनियमितता आढळलेल्या गडचिरोली तालुक्यातील १८ रासायनिक खते विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर देसाईगंज तालुक्यातील देसाईगंज व कोकडी येथील दोन केंद्रांचे रासायनिक खते परवाने रद्द करण्यात आले.
याशिवाय याच तालुक्यातील कोकडी येथील ३ व देसाईगंज येथील एक असे खतांचे चार व देसाईगंज येथील बियाणांचा एक परवाना निलंबित करण्यात आला. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
एकूण १७ केंद्रांना विक्रीबंदीचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये रासायनिक खतांचे ३, बियाणांचे ४ तर कीटकनाशक विक्रीच्या १० केंद्रांचा समावेश आहे. खतांचे ३४६ नमुने तपासून ११२ काढले, बियाणांचे ४१४ नमुने तपासून ३६० काढले, तर कीटकनाशकांचे ४७ नमुने तपासले, १३ नमुने सदोष आढळले.



