गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

ज्यांच्या संघर्षाने देशाचा बलात्कार कायदा बदलला, त्या ‘मथुरा’ यांना ‘लॉयड्स’चा मदतीचा हात ; हक्काच्या घरासाठी ५ लाखांची आर्थिक मदत

‘लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन‘कडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

गडचिरोली : भारतातील कोठडीतील लैंगिक अत्याचाराविरुद्धच्या कायद्यात (Custodial Rape Law) ऐतिहासिक बदल घडवून आणणाऱ्या आणि पाच दशकांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या ‘मथुरा’ आज वयाच्या ७२ व्या वर्षी गडचिरोलीच्या दुर्गम भागात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. ही बाब निदर्शनास येताच, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष श्री. मुकेश गुप्ता यांनी मदतीचा हात पुढे केला असून, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF) मार्फत त्यांना ५,००,००० (पाच लाख) रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मथुरा यांचे प्रकरण भारतीय न्यायव्यवस्थेतील एक मैलाचा दगड ठरले. त्यांच्यामुळेच कायद्यात सुधारणा होऊन लाखो महिलांना संरक्षण मिळाले. मात्र, दुर्दैवाने ज्या महिलेने देशाला नवा कायदा दिला, ती स्वतः आज मोडकळीस आलेल्या झोपडीत राहून पक्षाघाताशी (Paralysis) झुंज देत आहे. अन्न, आरोग्य आणि सुरक्षित निवार्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष पाहून लॉयड्स समूहाने पुढाकार घेतला.

लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने दिलेली ५ लाखांची ही मदत मथुरा यांना सुरक्षित आणि स्थिर घर बांधण्यासाठी तसेच त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दिली आहे. याशिवाय, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेशी (PMAY) जोडून कायमस्वरूपी निवासाची सोय करण्यात येणार आहे.

याप्रसंगी लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, “मथुरा यांची कहाणी संपूर्ण समाजावर प्रभाव पाडणारी ठरली, पण त्यांच्या वाट्याला मात्र नेहमीच उपेक्षा आली. अशा महत्त्वाच्या व्यक्तीला आजही मूलभूत सन्मानासाठी झगडावे लागत आहे, हे अत्यंत वेदनादायक आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना सन्मानजनक आणि सुखी जीवन मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

अध्यक्ष मुकेश गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाद्वारे केवळ आर्थिक मदतच नाही, तर सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी फाउंडेशन काम करत आहे. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून, मथुरा यांना सर्व लागू योजनांचा लाभ सातत्याने मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही अपेक्षित आहे.

लॉयड्स समूहाच्या या संवेदनशील उपक्रमामुळे गडचिरोलीच्या एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला त्यांच्या उतारवयात सन्मानाचा आधार मिळाला आहे. ही मदत केवळ एका व्यक्तीसाठी नसून, सामाजिक न्यायाप्रती असलेल्या कृतज्ञतेचे ते प्रतीक ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button