गडचिरोलीविदर्भ

घर जळाल्याने वेलादी कुटुंब उघड्यावर; युवा नेते हर्षवर्धनरावबाबा आत्राम धावले मदतीला

५ किलोमीटर चिखलातून पायदळ जात दिली आर्थिक मदत व संसारोपयोगी साहित्य ; शासकीय मदतीचे आश्वासन

अहेरी : तालुक्यातील जिमलगट्टाजवळील पत्तीगाव येथे सोमवारी (२८ जुलै) सायंकाळच्या सुमारास सुरेश वेलादी यांच्या घराला अचानक आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच, मंगळवारी (२९ जुलै) अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनरावबाबा आत्राम आणि डॉ. मिताली आत्राम यांनी तातडीने पत्तीगावाला धाव घेतली. त्यांनी पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासोबतच संसारोपयोगी साहित्य देऊन धीर व आधार दिला.

सुरेश वेलादी आणि त्यांचे कुटुंबीय धान रोवणीच्या कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी घरी परतले असता त्यांना आपले घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले दिसले. घर कुडाचे आणि सिंदीच्या झाडाच्या पानांनी आच्छादलेले असल्याने आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. यात घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे, घरकुलासाठी मिळालेले ३० हजार रुपये आणि घरातील रोख १० हजार रुपये असे एकूण ४० हजार रुपयांची रोख रक्कम, ढोलीत भरून ठेवलेले धान आणि अन्य मौल्यवान वस्तूही आगीत सापडल्याने वेलादी कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पीडित कुटुंबाचे जळालेल्या घरालगतच घरकुलाचे काम सुरू होते आणि तेथे सुरक्षित ठेवण्यात आलेले सिमेंटचे बॅगही पावसामुळे पूर्णतः खराब होऊन नुकसानग्रस्त झाले आहेत.

पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने, युवा नेते हर्षवर्धनरावबाबा आत्राम आणि डॉ. मिताली आत्राम यांनी आपल्या समर्थकांसह जिमलगट्टा जवळील किष्टापूर येथून तब्बल पाच किलोमीटरचा चिखलाचा रस्ता पायदळ तुडवत पत्तीगाव गाठले. त्यांनी पीडित कुटुंबीयांची थेट भेट घेऊन त्यांना मदत पोहोचवली. या कठीण प्रसंगात त्यांना धीर व आधार दिल्याने पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

हर्षवर्धनरावबाबा आत्राम यांनी तात्काळ तलाठी देविदास लेकामी यांना नुकसान झालेल्या घराचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच, आगीने नुकसान झालेल्या कुटुंबियांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, सुरेंद्र अलोणे, रतन दुर्गे, जाफर अली, मोसीन शेख, अयान पठाण आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button