दारू तस्करीचा पर्दाफाश ; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

दोघांना अटक ; शिवणी घाट परिसरात पोलिसांची कारवाई
गडचिरोली : तालुक्यातील शिवणी नदीपात्रातून दारु तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून लक्ष्मीपूजनाच्या पहाटेच दारु तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत कुख्यात दारु तस्कर किरण ताटपल्लीवार (३६) रा. शिवणी ता. गडचिरोली व स्नेहल हरिदास उंदिरवाडे (२९) रा. गडचिरोली यांना अटक करण्यात आली आहे. तर मनोज वामन उईके (२९) रा. शिवणी हा फरार झाला.
गडचिरोली तालुक्यातील शिवणी नदीपात्रातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच, ठाणेदार रेवनचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात ३१ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास सापळा रचला. दि. १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या पहाटे पोलिसांनी दारु तस्करीचा पर्दाफाश केला.
गुरुवारी रात्री दारू तस्कर किरण ताटपल्लीवार व त्याचे साथीदार चंद्रपूर जिल्ह्यातून बोटीच्या सहाय्याने दारू आणून शिवणी नदी घाटातून ट्रॅक्टर व स्कॉर्पिओमधून तस्करी करत होते. दरम्यान, गडचिरोली शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून दारु तस्करांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या देशी दारूच्या सुमारे १०० पेट्या जप्त केल्या. एमएच २२ ई-०००५ क्रमांकाची स्कॉर्पिओ आणि एमएच ३३ एसी ०४३२ किंमतीचा ट्रॅक्टर असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कुख्यात दारु तस्कर किरण ताटपल्लीवार याच्यासह दोघांना अटक करण्यात आली. तर एक जण फरार झाला.
सदर कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, राजेंद्र पुरी, तुषार खोब्रागडे, स्वदीप मेश्राम, अतुल भैसारे, आदींनी केली. अटक केलेल्या आरोपींची न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात रवानगी करण्यात आली आहे तर फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.



